josephs bible story योसेफाची गोष्ट

josephs bible story योसेफाची गोष्ट 



 हि गोष्ट याकोबाच्या सर्वात आवडता मुलगा योसेफाची आहे. योसेफाला दोन स्वप्ने पडली. त्याविषयी त्याने आपल्या भावांना सांगितले, स्वप्नांना देवाकडून मिळालेला संदेश समजत. जेव्हा योसेफाने आपल्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, तेव्हा खरे तर  "देव बोलत आहे " असे त्याला म्हणायचे होते.



           याकोब जेथे त्याचे वडील राहत होते  त्या देशात वस्ती करून राहिला. हि याकोबाच्या परिवाराची कथा आहे . योसेफ 17 वर्षाचा झाला होता. त्याच्या भावांबरोबर तो शेळ्या व मेंढ्या  राखीत असे. त्याचे भाऊ नीट वागत नव्हते, त्याविषयी तो आपल्या वडिलांना येऊन सांगत असे.


   इतर सर्व मुलांपेक्षा याकोबाचे योसेफावर जास्त प्रेम होते. कारण त्याच्या म्हातारपणी योसेफाचा जन्म झाला होता. त्याने योसेफासाठी एक खास झगा विणला होता. योसेफावर आपले वडील आपल्यापेक्षा अधिक प्रेम करतात याची सर्व भावांना जाणीव होती. म्हणून ते त्याचा द्वेष करीत. त्याच्याशी कठोरपणे वागत.

एकदा योसेफाला एक स्वप्न पडले. त्याने त्या स्वप्नाविषयी भावांना सांगितले. तेव्हा ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो म्हणाला, "मी पाहिलेले स्वप्न ऐका. "आपण सर्वजण गव्हाच्या शेतात कापणी करीत होतो. आपण पेंढ्या बांधीत असतांना माझी पेंढी उभी राहिली आणि तुमच्या पेंढ्यानी माझ्या पेंढीभोवती उभे राहून तिला नमन केले."

  







 " तु राजा होऊन आमच्यावर राज्य करणार आहेस, असे तुला वाटते काय?" त्याच्या भावांनी त्याला विचारले. त्याची स्वप्ने  व त्याने जे काही सांगितले त्यामुळे त्यांनी त्याचा अधिकच द्वेष केला. नंतर योसेफाला दुसरे स्वप्न पडले. तो त्याच्या भावांना म्हणाला, "मला एक दुसरे स्वप्न पडले. मी स्वप्नात सुर्य व चंद्र आणि अकरा तारे मला नमन करताना पाहिले."

 




त्याने हे स्वप्न आपल्या वडिलांनाही सांगितले. त्याचे वडील त्याला रागावले, "हे कसले स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ आणि मी येऊन तुला नमन करणार असे तुला वाटते काय?" हे ऐकून योसेफाचे भाऊ अधिकच जळफळू लागले. परंतु त्यांचे वडील याविषयी विचार करीत राहिले.  

  









  योसेफाचे भाऊ शखेम या ठिकाणी आपल्या वडिलांच्या शेळ्या मेंढ्या  चारायला घेऊन गेले. याकोब योसेफाला म्हणाला, "तु शखेम येथे जा आणि तुझे भाऊ व कळप ठीकठाक आहेत का ते पाहा  आणि माघारी येऊन मला त्यांची खुशाली सांग."

योसेफाने उत्तर दिले, "हो, मी जाऊन येतो." तेव्हा त्याच्या वडिलांनी हेब्रोनच्या खिंडीतून त्याला वाटे लावले. योसेफ शखेम येथे येऊन पोहोचला आणि इकडे तिकडे पाहू लागला. एका माणसाने त्याला पाहिले आणि विचारले, "तु काय  शोधतोस?"




"मी माझ्या भावांना शोधीत आहे. ते मेंढरांचे कळप चारीत आहेत." योसेफ म्हणाला, "ते कोठे असतील हे तुम्ही मला सांगू शकाल का ?"  तो माणूस म्हणाला, "ते येथून केव्हाच  निघून गेले आहेत. आपण दोथानला जाऊ, असे ते म्हणताना मी ऐकले." तेव्हा योसेफ आपल्या भावांच्या पाठोपाठ निघाला व त्याला ते दोथान येथे आढळले. त्यांनी त्याला दुरून येताना पाहिले, तेव्हा त्याच्या भावांनी त्याला ठार मारण्याचा कट केला. ते एकमेकांना म्हणाले, "तो पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येतो आहे! चला, आपण त्याला ठार करू आणि त्याचे प्रेत एका कोरड्या विहिरीत फेकून देऊ. एका जंगली जनावराने त्याला ठार केले असे आपण सर्वांना सांगू! मग  पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते."

     

     रऊबेन या भावाने त्यांचे हे बोलणे ऐकून योसेफाला वाचविण्याचा प्रयत्न केला. "आपण त्याला ठार मारायला नको," तो म्हणाला, "त्याला फक्त या कोरड्या विहिरीत ढकलून द्या, पण त्याला इजा मात्र करू नका." योसेफाचा प्राण वाचवावा  आणि त्याला परत आपल्या वडिलांकडे पाठवावे अशी त्याची इच्छा होती, म्हणून तो असे म्हणाला. जेव्हा योसेफ त्याच्या भावांजवळ पोहोचला, तेव्हा त्यांनी त्याचा तो खास सुंदर झगा फाडून टाकला आणि त्याला एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले.







        नंतर ते भोजन करीत असताना त्यांना मिसर (इजिप्त ) देशाकडे जाणाऱ्या इश्माएली व्यापाऱ्यांची एक टोळी दिसली. त्यांच्या उंटांवर ते मसाले आणि मोलामहागाची सुगंधी द्रव्ये घेऊन चालले होते. यहूदा आपल्या भावांना म्हणाला, "आपल्या भावाला ठार करून त्याच्याविषयी खोटे सांगण्याने आपल्याला काय मिळणार आहे? आपण त्याला या व्यापाऱ्यांना विकून टाकू. मग त्याला इजा करावी लागणार नाही. काहीही झाले तरी तो आपला भाऊ आहे." या गोष्टीला त्याच्या भावांनी संमती दिली. ते व्यापारी जवळ आल्यावर, त्यांनी योसेफाला विहिरीबाहेर काढले  आणि चांदीची 20 नाणी घेऊन त्याला विकले. त्या व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात नेले.

    त्यावेळी रऊबेन तेथे नव्हता. तो विहिरीजवळ आला आणि पाहतो तो योसेफ तेथे नव्हता. हे पाहून त्याला खूप दु:ख झाले. तो भावांकडे जाऊन म्हणाला, "योसेफ तेथे नाही!  आता मी काय करू?"



तेव्हा त्यांनी एक बकरा कापला आणि त्याच्या रक्तात योसेफाचा झगा भिजवला. त्यांनी तो झगा त्यांच्या वडिलांकडे नेऊन म्हटले, "आम्हांला हा झगा सापडला, हा तुमच्या मुलाचा आहे काय?" तो झगा योसेफाचा आहे हे याकोबाने ओळखले. तो म्हणाला, "हो, हा योसेफाचाच झगा आहे! कोणी जंगली जनावराने त्याला मारले आहे. माझा मुलगा योसेफ याचे तुकडे तुकडे केले आहेत!" असे म्हणून याकोब फार दु:खी झाला. अनेक दिवस त्याने शोक केला. त्याच्या सर्व मुलांनी आणि मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण  तो कोणाचेही ऐकेना. तो म्हणाला, "मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीन."





 

मिसर देशात योसेफ  (उत्पत्ति 41:14-46)







योसेफ मिसर देशांत असताना अनेक घटना घडल्या. प्रभु  योसेफाबरोबर  असल्यामुळे योसेफ यशस्वी झाला. परंतु जि गोष्ट त्याने केली नव्हती त्या गोष्टीचा त्याच्यावर आरोप ठेवून त्याला काही काळ तुरुंगात ठेवले होते. तुरुंगात असताना त्याने अनेकांना मदत केली. देवाच्या आत्म्याने स्वप्नांचा अर्थ सांगण्यास योसेफाला मदत केली. मिसर देशाचा राजाला स्वप्न पडले आणि त्याने योसेफाला बोलावणे पाठवले.

    योसेफाला तात्काळ तुरुंगातून काढून आणले. तो राजासमोर स्वच्छ दाढी करून आला. राजा योसेफाला म्हणाला, "मला एक स्वप्न पडले. पण त्याचा अर्थ कोणीच सांगू शकत नाही. मी असे ऐकतो की, तुला स्वप्नांचा अर्थ समजतो."  "महाराज, " योसेफाने उत्तर दिले, देवच मला ते समजण्यास साहाय्य करतो!"  



       राजा म्हणाला, "मी स्वप्नात नाईल नदीच्या किनाऱ्यावर उभा होतो. तेव्हा एकाएकी सात लठ्ठ गाई नदीतून बाहेर पडल्या आणि गवत खाऊ लागल्या. नंतर सात अशक्त गाई बाहेर आल्या. मी इतक्या हडकुळ्या गाई कधी पाहिल्या नव्हत्या. त्या अशक्त  गाईंनी  लठ्ठ  गाईंना खाऊन टाकले. तरी त्या पहिल्यासारख्याच अशक्त राहिल्या.मग मी जागा झालो. 



काही वेळाने मला दुसरे स्वप्न पडले : एकाच ताटाला सात कणसे लागलेली मी पाहिली. ती भरदार तयार झालेली होती. त्यानंतर सात बारीक सुकलेली कणसे मला दिसली. त्यांनी भरदार कणसे खाऊन टाकली. मी ज्ञानी लोकांना माझी स्वप्ने सांगितली. पण कोणालाही त्यांचे स्पष्टीकरण  देता आले नाही." योसेफ राजाला म्हणाला, "महाराज दोन्ही स्वप्नांचा अर्थ सारखाच आहे. देव काय करणार आहे, हे त्यांने तुम्हांला या स्वप्नांतून सांगितले आहे. सात धष्टपुष्ट  गाई आणि सात भरदार कणसे म्हणजे समृद्धीची सात वर्ष. सात अशक्त गाई  व सात करपलेली कणसे म्हणजे सात वर्षांचा दुष्काळ. लोक समृद्धीची सर्व चांगली वर्षे विसरतील. कारण दुष्काळ फारच भयंकर असेल. त्यामुळे देशाचे फारच नुकसान होईल. आपण एकच गोष्ट दोन वेळा पाहिली. हि देवाची योजना आहे आणि तो ती लवकरच घडवून आणणार आहे.

 



  " महाराजांनी लवकरच एक ज्ञानी व समंजस माणूस शोधून त्याला मिसर देशावर नेमावे. तसेच इतरही अधिकारी नेमावेत. त्यांनी समृद्धीच्या पहिल्या सात वर्षांत धान्याचा 1/5 भाग गोळा करावा. त्यांनी तो शहरा-शहरांतून सुरक्षितपणे साठवावा. म्हणजे दुष्काळाच्या सात वर्षांत देशात पुरेसे अन्न राहील. याप्रकारे देशातील लोक उपाशी मरणार नाहीत."


    राजा आणि त्याचे अधिकारी यांनी या योजनेला मान्यता दिली. राजा त्यांना म्हणाला, "योसेफापेक्षा अधिक चांगला माणूस आपल्याला कधीच मिळणार नाही. त्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे." राजा योसेफाला म्हणाला, "देवाने तुला हे सर्व दाखवले आहे. त्यावरून तु सर्वांपेक्षा अधिक ज्ञानी आहेस हे स्पष्टच आहे. म्हणून मी तुला माझ्या देशावर कारभारी नेमतो. माझी सर्व प्रजा तुझा हुकूम पाळील. माझ्या खालोखाल या राज्यात तुलाच अधिकार राहील. मी आता तुला मिसर देशाचा राज्यपाल बनवीत आहे." 

               


  त्यानंतर राजाने आपली राजमुद्रा असलेली अंगठी योसेफाच्या बोटात घातली. तसेच तागाचा एक उत्तम झगा योसेफाच्या अंगावर चढवला. त्याच्या गळ्यात सोन्याची एक साखळी घातली आणि दुसऱ्या क्रमांकाचा राजेशाही रथ त्याने योसेफासाठी दिला. योसेफाचे अंगरक्षक त्याच्या रथापुढे जाऊन,"वाट करा! वाट सोडा! बाजूला व्हा!" असे ओरडत जाऊ लागले. राजाने योसेफाला संपूर्ण मिसर देशावर अधिकार दिला. राजा योसेफाला म्हणाला,  "मी राजा आहे. मी असे फर्मान काढतो की, तुझ्या परवांगी शिवाय मिसर देशात कोणी काहीही करू नये." 

          

      



  त्याने योसेफाला मिसरी भाषेतील नाव दिले. त्याने एका मिसरी धर्मगुरूच्या मुलीशी त्याचे लग्नही लावून दिले.




       मिसर देशाच्या राजाची सेवा सुरु केली त्यावेळी योसेफ 30 वर्षांचा होता. त्याने सबंध मिसर देशातून प्रवास केला.














    


योसेफ आपल्या भावांना आश्चर्यचकित करतो.

(उत्पत्ति 43:29-34 )


योसेफाच्या सर्व योजना अमलात आणल्या गेल्या. दुष्काळाची सात वर्ष आली, त्यावेळी मिसर देश भरपूर धान्य असल्यामुळे दुष्काळाला तोंड देण्यास तयार होता.

                 दुष्काळ पडल्यामुळे याकोबाने आपल्या मुलांना मिसर देशाकडे  अन्नधान्य विकत आणण्यास पाठवले. परंतु तेथे योसेफ अधिकारी होता याची त्यांना कल्पना नव्हती. ते हेर आहेत असे योसेफाने भासवले. परंतु योसेफाचे आपल्या भावांवर खरोखर प्रेम होते. त्या भावांनी योसेफाला त्यांच्या वडिलांविषयी आणि घरी सोडून आलेल्या त्यांच्या सर्वांत धाकट्या भावाविषयी सांगितले. 

                          ते परत जायला निघाले, त्यावेळी योसेफाने त्यांचे पैसे नकळत त्यांच्या पोत्यांत ठेवून दिले. पुन्हा धान्य विकत न्यावयाचे असेल तर तुमच्या सर्वांत धाकट्या भावाला बन्यामिनाला घेऊन या असे त्याने त्यांना सांगितले. कारण आपल्या धाकट्या भावाला पाहण्यासाठी योसेफ व्याकुळ झाला होता. 

बन्यामिनाला बरोबर घेतल्याशिवाय अन्नधान्यासाठी परत मिसर देशाकडे जाण्यास सर्व भावांनी आपल्या वडिलांना नकार दिला. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली कि, धान्य संपून उपास घडण्याची वेळ आली. त्यावेळी याकोबाने सर्वांत धाकटा मुलगा बन्यामीन याला, मिसर देशाकडे जाण्याची परवानगी दिली.त्याला भीती वाटत होती कि, बन्यामीन परत आपल्याला दिसणार नाही.योसेफाने आपल्या धाकटा भाऊ बन्यामीन याला पाहिले तेव्हा तो म्हणाला, "तर हा आहे तुमचा धाकटा भाऊ. याच्याविषयीच तुम्ही मला सांगितले होते ना? बाळा, देव तुला आशीर्वाद देवो," असे बोलून योसेफ ताबडतोब तेथून गेला, कारण त्याला रडू आले. तो आपल्या खोलीत गेला आणि खूप रडला. मग तोंडावर पाणी फिरवून तो बाहेर आला.आपल्या भावना ताब्यात ठेवून त्याने भोजन वाढण्यास सांगितले. योसेफाला एका मेजावर आणि त्याच्या भावांना दुसऱ्या मेजावर जेवायला वाढले. त्याचे भाऊ त्याच्या समोरच्या मेजावर त्यांच्या वयोमानाप्रमाणे बसवले होते. यामुळे त्यांना आश्चर्य वाटले! योसेफाच्या मेजावरील अन्नच त्यांना वाढण्यात आले. बन्यामिनाला इतरांपेक्षा अधिक वाढण्यात आले.  सर्व भावांनी मनोसक्त खाणेपिणे केले.



हरवलेला पेला 

(उत्पत्ति 44:1-34 )



योसेफाने प्रमुख दासाला सांगितले, "या माणसांची पोती, धान्याने जेवढी गच्च भरता येतील तेवढी भरा. प्रत्येकाचे पैसे धान्यावर ठेवा. माझा चांदीचा पेला सर्वांत धाकट्या भावाच्या पोत्याच्या वरच्या बाजूला, त्याच्या पैशांसह ठेवा."