देव इसहाकाला पत्नी देतो/God gives Isaac a wife
Bible story in marathi
Bible story in marathi
अब्राहाम खूपच म्हातारा होत चालला होता. देवाने त्याला खूप आशीर्वादित केले होते. एक दिवशी तो आपल्या सर्वात वृध्द सेवकाला म्हणाला,
"तु इसाहाकासाठी एक योग्य वधू शोधून आणावी, अशी माझी इच्छा आहे. तु आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा देव जो परमेश्वर त्याच्या नावाने वचन दे कि, तु कनान देशातील लोकांमधून माझ्या मुलासाठी कोणतीही वधू निवडणार नाहीस.
तु माझ्या देशांत जा आणि माझ्या लोकांमधील एक मुलगी, माझ्या मुलासाठी वधू म्हणून आण."
पण सेवकाने विचारले, "जर ती मुलगी माझ्याबरोबर आली नाही तर? इसहाकाला परत तुमच्या देशात पाठवू का?
अब्राहामाने उत्तर दिले, "खबरदार, माझ्या मुलाला तेथे पाठवायचे नाही! देवाने मला माझ्या घरातून व माझ्या लोकांतून येथे आणले. त्याने मला खात्रीपूर्वक आश्वासन दिले कि, तो माझ्या मुलांना व मुलांच्याही मुलांना हा प्रदेश देणार आहे. तो देव त्याच्या दूताला तुझ्यापुढे पाठवील आणि माझ्या मुलासाठी वधू आणण्यास मदत करील. जर मुलगी इकडे येण्यास तयार नसेल, तर तु या वचनातून मुक्त होशील. परंतु माझ्या मुलाला त्या देशात परत पाठवायला तु संमती देऊ नको." त्या सेवकाने अब्राहामाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन दिले.
नंतर त्या सेवकाने आपल्या मालकाचे दहा उंट घेतले व तो अब्राहामाच्या मूळ गावी गेला. तो तेथे पोहचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. गावाबाहेरील विहिरीवर स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत होत्या. त्याने प्रार्थना केली, "प्रभु , माझा धनी अब्राहाम याच्या देवा, मला आज साहाय्य कर आणि माझ्या धन्याला दिलेले तुझे वचन पूर्ण कर. मी या विहिरीजवळ आहे. शहरातील तरुण मुली येथे पाणी भरण्यास येतात. मी त्यांपैकी एका मुलीला म्हणेन, 'कृपा करून मला प्यायला थोडे पाणी दे. 'ती जर म्हणाली, "तुम्ही प्या आणि तुमच्या उंटांनाही मी पाणी पाजते' तर तीच मुलगी तुझा सेवक इसहाक याच्यासाठी वधू म्हणून निवडली आहेस असे मी समजेन. असे जर घडले तर माझा धनी अब्राहाम याला दिलेले वचन तु पूर्ण केले आहेस हे मला कळून येईल."
त्या सेवकाची प्रार्थना संपण्यापूर्वी रिबका तेथे पाण्याचा घडा घेऊन आली. ती अब्राहामाचा पुतण्या बथूवेल याची मुलगी होती. ती अतिशय देखणी होती. विहिरीच्या पायऱ्या उतरून ती विहिरीत गेली व पाण्याचा घडा भरून पुन्हा वर आली. अब्राहामाचा सेवक पळतच तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, "कृपा करून मला प्यायला पाणी दे."
ती म्हणाली, "प्या बाबा." आणि तिने चटकन त्याच्यासाठी पाणी ओतले. त्याचे पाणी पिऊन होताच ती म्हणाली, "तुमच्या उंटांसाठीही मी पोटभर पाणी प्यायला आणते." काही वेळातच तिने सर्व उंटांना पाणी पाजले. प्रभूने योग्य वधू दाखवली आहे का या गोष्टीची खात्री करण्यासाठी सेवक शांतपणे त्या मुलीकडे पाहत होता.
उंटांना पाणी पाजून झाल्यावर त्या सेवकाने रिबकेला सोन्याची एक मोलवान नथ आणि सोन्याच्या दोन मोठ्या बांगड्या दिल्या. त्याने तिला विचारले, "तु कोणाची मुलगी आहेस? आज रात्री तुझ्या घरामध्ये मुक्काम करण्यासाठी मला आणि माझ्या माणसांना जागा आहे काय?
ती म्हणाली, "मी बथूवेलाची मुलगी. तूमच्या उंटांसाठी भरपूर चारा आहे आणि तुम्हां सर्वांना राहण्यास आमच्या घरात पुरेशी जागा आहे."
मग अब्राहामाच्या सेवकाने गुडघे टेकले आणि प्रभूचे आभार मानले. त्याने म्हटले, "प्रभूची स्तुती असो. त्याने माझ्या धन्याला दिलेले वचन खरोखर पूर्ण केले आहे. प्रभूने मला माझ्या धान्याच्या लोकांकडेच आणले आहे!"
त्यानंतर रिबका धावतच तिच्या घरी गेली आणि घडलेली सर्व हकीकत तिने सांगितली.
अब्राहामाच्या सेवकाचे प्रेमाने स्वागत करण्यात आले. रीबकेच्या कुटुंबियांना त्याने अब्राहाम आणि इसहाकाविषयी सांगितले.
आपण का आलो, आपली प्रार्थना काय होती, हे सर्व त्याने सांगितले.
तेव्हा रिबकेने इसाहाकाची वधू व्हावे अशी देवाची खरोखर इच्छा आहे. असे सर्वांना वाटले.
इसाहाकाशी लग्न करण्यास त्यांनी रिबकेला त्याच्या सेवकाबरोबर जाऊ दिले.