The story of Jacob in the bible
याकोबाची गोष्ट (उत्पति 25:24-34)
Esau and Jacob एसाव आणि याकोब
वडिलांचे शेवटले आशीर्वाद घरातील सर्वांत थोरल्या मुलाला मिळावेत अशी त्या काळात सामाजिक पद्धत होती. वडिलांच्या मृत्युनंतर कुटुंबांच्या मालमत्तेचा 2/3 भाग थोरल्या मुलाला मिळत असे. कुटुंबाचे सर्व महत्वाचे निर्णय तो घेत असे. हे थोरल्या मुलाचे हक्क असतं.
***
रिबकेचे दिवस भरले आणि तिला जुळी मुले झाली. पहिला तांबूस रंगाचा होता आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर केस होते.त्याचे नाव एसाव ( म्हणजे "केसाळ") असे ठेवण्यात आले. दुसरा एसावाची टाच धरून जन्मला. त्याचे नाव याकोब ( म्हणजे "फसवणारा ") असे ठेवण्यात आले. या दोघांचा जन्म झाला त्यावेळी इसहाक 60 वर्षाचा होता.
दोन्ही मुले मोठी झाली. एसावाला मोकळ्या रानात फिरायला आवडे. तो उत्तम शिकारी बनला. याकोब स्वभावाने शांत होता. त्याला घरातच राहणे आवडे.
इसहाकाला एसाव आवडायचा. कारण एसावाने मारलेल्या जनावरांचे मांस खायला त्याला आवडायचे. रिबकेला मात्र याकोब अधिक आवडत असे.
याकोब म्हणाला, "तुला ती मिळेल पण तु तुझ्या थोरलेपणाचे हक्क मला दिले पाहिजेत." एसाव म्हणाला. "मला खूप भूक लागली आहे. मी मरायला लागलो आहे! मला माझ्या हक्कांची पर्वा नाही. मला ती आमटी खायला दे."
याकोबाने उत्तर दिले, "आधी वचन दे, कि तु तुझे हक्क मला देशील म्हणून." तेव्हा एसावाने वचन दिले व आपले थोरले पणाचे हक्क याकोबाला दिले. मग याकोबाने एसावाला थोडी भाकरी व आमटी दिली. एसाव खाऊन पिऊन तेथून निघून गेला. आपल्या हक्कांची त्याने पर्वा केली नाही.
याकोब वडिलांना फसवतो ( उत्पति 27:1-41)
आपल्या मरणापूर्वी थोरल्या मुलाला आशीर्वाद देणे इसहाकाला फार महत्वाचे वाटत होते. तसा आशीर्वाद दिला, तरच इसहाकाच्या वंशजांना देवाने जे देऊ केले होते ते त्याच्या पुत्राला मिळणार होते.
इसहाक आता म्हातारा आणि आंधळा झाला होता. त्याने आपल्या थोरल्या मुलाला, एसावाला बोलावून सांगितले,
"माझ्या मुला, तु पाहतोस, कि मी आता म्हातारा झालो आहे. मी कदाचित फार दिवस जगणार नाही. तर जा, आणि माझ्यासाठी एखाद्या चांगल्या पशूची शिकार करून आण आणि त्याचे माझ्या आवडीचे कालवण करून माझ्यासाठी आण. मी ते खाईन आणि मरण्यापूर्वी आधी तुला आशीर्वाद देईन."
इसहाक एसावाशी बोलत असतांना रिबका ऐकत होती. एसाव शिकारीसाठी बाहेर पडल्यावर ती याकोबाला म्हणाली,
"मी आत्ताच तुझ्या वडिलांना एसावाला असे म्हणतांना ऐकले कि, जा माझ्यासाठी एखाद्या पशूची शिकार करून त्याचे कालवण करून आण. ते खाल्ल्यावर मरण्यापूर्वी मी तुला माझे शेवटचे आशीर्वाद देईन. तर आता बाळा, याकोबा, मी काय म्हणते ते ऐक. आपल्या कळपाकडे जा व बकरीची दोन पिलं घेऊन ये. तुझ्या वडिलांना आवडणारे जेवण मी तयार करते. ते तु त्यांना खायला घेऊन जाऊ शकतोस. मग ते त्यांच्या मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देतील."
याकोबाने उत्तर दिले, "पण एसाव तर केसाळ आहे अन माझी कातडी तर मऊ आहे. माझे वडील मला स्पर्श करून ओळखतील, कि मी त्यांना फसवीत आहे. मग आशीर्वादाच्या ऐवजी मी स्वत:वर शाप ओढवून घेईन."
त्याची आई म्हणाली, "तो शाप माझ्यावर येवो. जा आणि ती करडे घेऊन ये. काय करायचे ते मी तुला सांगेन." तेव्हा याकोबाने करडे आणून आईला दिली. तिने त्याच्या वडिलांसाठी रुचकर भोजन तयार केले. त्यानंतर एसावाचा सर्वांत उत्तम पोशाख तिने याकोबाच्या अंगावर चढवला. बकऱ्यांचे केसाळ कातडे हातांवर व मानेवर लावले. तिने रुचकर मांस आणि भाकरी त्याला दिल्या.
नंतर याकोब आपल्या वडिलांजवळ गेला आणि म्हणाला, "बाबा!" इसहाकाने विचारले, माझ्या मुला, तु कोण आहेस?
याकोबाने उत्तर दिले, "मी तुमचा थोरला मुलगा एसाव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपा करून उठून बसा आणि मी आणलेल्या मासांतले मांस खा. नंतर मला आशीर्वाद द्या."
इसहाक म्हणाला, "मुला, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?" याकोब उत्तरला, "प्रभु जो तुमचा देव त्याने मला साहाय्य केले." इसहाक याकोबाला म्हणाला, "माझ्या जवळ ये, मला तुला हात लावून पाहू दे, तु खरोखर एसावाच आहेस ना? याकोब वडिलांच्या जवळ गेला. इसाहाकाने याकोबाला चाचपून पाहिले आणि म्हटले, "आवाज याकोबाचा, पण हात तर एसावासारखे वाटतात." तो याकोब आहे ते इसाहाकाला समजले नाही, कारण त्याचे हात एसावासारखे केसाळ लागत होते. आशीर्वाद देण्यापूर्वी इसहाकाने परत विचारले, "तु एसावच आहेस ना?" "हो, मी एसावच आहे." याकोब म्हणाला.
इसहाक म्हणाला, "मांसाचे थोडे जेवण घेऊन ये. ते खाल्ल्यावर मी तुला आशीर्वाद देईन." याकोबाने जेवण आणले. त्याच्याबरोबर थोडा द्राक्षारसही आणला. नंतर त्याचे वडील त्याला म्हणाले, "माझ्या मुला, माझ्याजवळ येऊन माझे चुंबन घे." याकोब चुंबन घेण्यासाठी जवळ आला, तेव्हा इसहाकाने त्याच्या कपड्यांचा वास घेतला. मग त्याला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, "माझ्या मुलाच्या कपड्यांना प्रभूने आशीर्वादित केलेल्या शेताचा सुगंध आहे. देव तुला आकाशातून दहिवर देवो आणि तुझी शेते सुपीक करो!
तो तुला भरपूर धनधान्य आणि द्राक्षारस देवो! पुष्कळ लोक तुझी सेवा करोत, तुला मानसन्मान देवोत. तु तुझ्या लोकांचा स्वामी हो. ते तुझा आदर करोत. जे तुला शाप देतील त्यांना देव शाप देवो, जे तुला आशीर्वाद देतील त्यांना देव आशीर्वाद देवो."
इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देणे संपवले. याकोब गेल्यावर थोड्याच वेळात त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला. त्याने रुचकर जेवण बनवले व त्याच्या वडिलांकडे नेले. तो म्हणाला, "बाबा, कृपा करून उठून बसा, मी आपल्यासाठी आणलेले मांस खा आणि मला आशीर्वाद द्या."
इसहाकाने विचारले, "तु कोण आहेस?" त्याने उत्तर दिले, "तुमचा थोरला मुलगा एसाव." इसहाक थरथर कापू लागला! त्याने विचारले, "मग ज्याने मला मांसाचे भोजन आणले होते तो कोण होता? तु येण्यापूर्वी ते अन्न मी खाल्ले आणि त्याला आशीर्वाद दिला. तो मी आता परत घेऊ शकत नाही."
हे ऐकून एसाव अस्वस्थ झाला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, "बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या!" इसहाकाने उत्तर दिले, "तुझ्या भावाने माझी फसवणूक केली. त्याने तुझे आशीर्वाद घेतले." एसाव म्हणाला, "मला फसवण्याची याकोबाची ही दुसरी वेळ आहे. तो फसवणारा आहे, यात आश्चर्य नाही.थोरला भाऊ या नात्याने असलेले माझे हक्क त्याने हिरावून घेतले आणि आता माझे आशीर्वादही त्याने घेतले. बाबा, तुमच्याकडे माझ्यासाठी एकही आशीर्वाद नाही का?"
इसहाक म्हणाला, "मी याकोबाला आशीर्वादित केले आहे. तो तुझ्यावर सत्ता करील. त्याचे सर्व नातेवाईक त्याची सेवा करतील. त्याला धान्य आणि द्राक्षारसही मिळेल. माझ्या मुला, आता तुझ्यासाठी एकही आशीर्वाद राहिला नाही!" तरी एसाव आपल्या वडिलांजवळ विनवणी करीत राहिला, "बाबा, तुमच्याजवळ एकाच मुलासाठी आशीर्वाद आहेत का? मलाही आशीर्वाद द्या, बाबा!" असे म्हणून तो रडू लागला.
मग इसहाक त्याला म्हणाला, "तुझ्यासाठी आकाशातील दहिवर नाही. तुझ्यासाठी चांगली शेते नाहीत. तु आपल्या भावाचा दास होशील. परंतु तु योद्धा बनशील. जेव्हा तु प्रतिकार करशील तेव्हा तु स्वतंत्र मनुष्य होशील." त्याच्या वडिलांनी याकोबाला आशीर्वाद दिले म्हणून
एसावाने याकोबाचा द्वेष केला. त्याने मनात ठरवले, "माझे वडील मरेपर्यंत मी थांबेन. मग मी याकोबाला ठार करीन.
स्वर्गाकडे जाणारी शिडी (उत्पति 28: 11-22 )
एसाव याकोबाला ठार मारण्याचा बेत करीत आहे, हे रिबकेने ऐकले. तेव्हा तिने याकोबाला मेसोपोटेमियात आपला भाऊ लाबान याच्या घरी पळून जाण्यास सांगितले. तिकडे दूरवरच्या ठिकाणी याकोब सुरक्षित राहील हे रिबकेला ठाऊक होते.
याकोब तेथे जाण्यास निघाला. सूर्यास्त झाल्यावर एके ठिकाणी तो रात्रीचा विसावा घेण्यास थांबला. एका दगडावर डोके टेकून तो झोपला असतांना त्याला एक स्वप्न पडले. त्याने पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारी शिडी स्वप्नात पाहिली. त्या शिडीवरून देवाचे दूत खालीवर ये जा करीत होते. याकोबाजवळ परमेश्वर उभा होता. "मीच परमेश्वर आहे. मी अब्राहाम आणि इशाक यांचा देव आहे." परमेश्वर म्हणाला, "मी तुला आणि तुझ्या मुलाबाळांना हा प्रदेश देईन. त्यांची संख्या खूप वाढेल. ते सगळीकडे विरखतील. तु आणि तुझ्या संतानाद्वारे मी सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करीन. लक्षात ठेव, जेथे कोठे तु जाशील, तेथे मी तुझ्याबरोबर राहून मी तुझा प्रतिपाळ करीन. तुला या भूमीकडे मी परत आणीन. मी दिलेली सर्व वचने पूर्ण करीपर्यंत मी तुला कधीही सोडणार नाही."
याकोब जागा झाला आणि म्हणाला, " या ठिकाणी प्रभूची वस्ती आहे, पण मला हे माहित नव्हते!" तो घाबरून पुढे म्हणाला, "हि जागा खरंच भीतीदायक आहे! हे देवाचे घर, स्वर्गाचे दार असले पाहिजे."
दुसरे दिवशी याकोब सकाळीच उठला. त्याच्या उशाला घेतलेला दगड घेऊन त्याने त्या ठिकाणाची खूण म्हणून उभा केला. ती एक खास जागा बनावी म्हणून त्याने त्या दगडावर तेल ओतले. त्या जागेला त्याने "बेथेल" म्हणजे "देवाचे घर" असे नाव दिले.
याकोब देवाची झुंज देतो (उत्पति 32:23-31)
याकोब आपला मामा लाबान याच्या घरी सुखरूप पोहचला. त्याने अनेक वर्षे लाबानाच्या जनावरांचे कळप राखायचे काम केले. त्याने लाबानाच्या मुली लेआ व राहेल यांच्याशी विवाह केले. याकोबाला अनेक मुले झाली. तो श्रीमंत झाला.
त्यानंतर याकोबाने आपल्या घरी परतण्याचे ठरवले. त्याने व त्याच्या कुटुंबाने त्यांचा परतीचा प्रवास सुरु केला. पण याकोबाने आपल्या भावाला फसवले होते म्हणून त्याला सामोरे जाण्यास तो भीत होता. त्याने आपल्या कळपांबरोबर आपल्या सेवकांना पुढे पाठवले. आपल्या भावाला 500 जनावरे देण्याचे त्याने ठरवले. एवढी मोठी भेट दिल्याने एसाव त्याला क्षमा करील अशी त्याला आशा होती.
याकोबाने आपले सारे कुटुंब आणि कळप नदीच्या पलीकडे पाठवले आणि तो एकटाच मागे राहिला. त्या रात्री एका पुरुषाने येऊन याकोबाशी पहाट होईपर्यंत झुंज केली. आपण जिंकणार नाही असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या कंबरेवर तडाखा मारला आणि त्यामुळे त्याच्या मांडीचा सांधा उखळला. नंतर तो पुरुष म्हणाला, "दिवस उजाडतो आहे, मला जाऊ दे."
याकोबाने उत्तर दिले, "तु मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही." त्या पुरुषाने विचारले, तुझे नाव काय? "याकोब" त्याने उत्तर दिले.
मग तो पुरुष म्हणाला, "यापुढे तुझे नाव याकोब राहणार नाही. तु देवाबरोबर आणि माणसाबरोबर झुंज केलीस आणि तु जिंकलास म्हणून तुला इस्त्राएल असे म्हणतील.
याकोब म्हणाला, "आता तुझे नाव सांग." परंतु त्या पुरुषाने उत्तर दिले, "तुला माझे नाव कशाला जाणून घ्यायला हवे?" असे म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला. याकोब म्हणाला, "मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे आणि तरीही मी जिवंत आहे." म्हणून त्याने या जागेचे नाव "पनिएल" म्हणजे "देवाचे मुख" असे ठेवले. याकोबाने "पनिएल" सोडले त्या वेळी सूर्योदय झाला होता. त्याच्या दुखावलेल्या मांडीमुळे तो लंगडत होता.
त्याच दिवशी दोन भावांची भेट झाली. एसाव धावतच याकोबाला भेटायला आला, तेव्हा याकोबाच्या मनातील भीती नाहीशी झाली. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. एकमेकांची चुंबने घेतली. आनंदामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही वेळ त्यांनी सुख दु:खाच्या गोष्टी केल्या. त्यानंतर एसाव अदोम या ठिकाणी परत जायला निघाला. याकोब आणि त्याच्या बरोबरचे सर्वजण हळूहळू प्रवास करीत निघाले. ते कनान देशातील शखेम या ठिकाणी सुखरूप येऊन पोहचले. अशा रीतीने याकोब आपल्या मायदेशी परत आला.